Templeआईचं देऊळआईचं मंदिरमंदिर

शेतकरी भावडांनी बांधलं आईचं देऊळरुपी मंदिर

0

माझा कट्टा | डेस्क

आजकाल समाजात मुखवटे पांघरून मॉडर्नपणा जपणाऱ्या मुलांमुळ वृद्धाश्रमाची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं चित्र आहे. एकीकडे अगदी गावखेड्यापासून ते शहरापर्यंत, या माडर्नपणाच्या जगात, “हम दो हमारे दो” ही कुटुंब पद्धतीमुळे वृद्धाश्रमात लक्षणीय वाढ झालीय. तर दुसरीकडे शेतकरी अन ऊसतोड कामगार कुटुंब असणाऱ्या भावडांनी….आपली दिवंगत आई सतत आपल्या समोर रहावी म्हणून थेट आईचं देऊळचं बांधलंय..

आई म्हणजे वात्सल्याची मूर्ती.. आई म्हणजे प्रेमाचे प्रतीक..आई म्हणजेच सर्वस्व..अशा आपल्या जन्मदात्या आईच्या स्मृती जपण्यासाठी , बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील खाडे बंधूंनी तब्बल नऊ लक्ष रुपये खर्चून सावरगाव घाट या ठिकाणी आपल्या दिवंगत आई राधाबाई शंकर खाडे यांचे अतिशय भव्य व देखणे असे मंदिर उभारले आहे.. या मंदिरात दिवंगत राधाबाई यांचे अत्यंत सजीव असे वाटणारे तब्बल पावणे तीन फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आलीय.

राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथील रहिवासी असलेल्या, शेतकरी कुटुंबातील राधाबाई शंकर खाडे यांचे 18 मे 2022 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाने खाडे कुटुंबाला मोठा धक्का बसला. या कुटुंबात त्यांचे पती शंकर खाडे यांच्यासह त्यांचे तीन मुलं विष्णू राजेंद्र आणि छगन तसेच विवाहित मुलगी आशा असे त्यांचे कुटुंब आहे. राधाबाई यांच्या निधनानंतर एक महिन्यातच या तिन्ही भावंडांनी आपल्या दिवंगत आईची स्मृती कायम असावी, असे काहीतरी करू असा विचार करून आपल्या जागेमध्ये आईचे भव्य देऊळ बांधण्याचा निश्चय केला.. केवळ निश्चय करूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी तातडीने मंदिराचे काम सुरू केले..

10 बाय 13 च्या जागेत या मंदिराचे उभारणीचे काम सुरू झाले. 6 महिन्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी या ठिकाणी शिल्पाकृती असलेली अतिशय आकर्षक असे सजीव वाटावी अशा प्रकारची मूर्ती बसवण्याचे ठरवले. मूर्तिकाराचा शोध घेऊन त्यांनी पुण्यातील कातोरे या शिल्पकाराला मूर्ती बनवण्याचे काम दिले..कातोरे यांनी तब्बल 4 ते 5 महिने या मूर्तीवर काम करून अतिशय आकर्षक व बघताक्षणी सजीव वाटावी अशा प्रकारची राधाबाई खाडे यांची सुंदर मूर्ती तयार केली.. पावणे तीन फूट उंच अशी मूर्ती त्यांनी बनवली..

आपल्या आईच्या निधनानंतर राजेंद्र, विष्णू व छगन या तिन्ही भावडांनी एक वर्षाच्या आत आपल्या आईचे देऊळ बांधण्याचा संकल्प पूर्ण करायचा असा निश्चय केला होता. त्यानुसार आता त्यांचा संकल्प पूर्ण झाला आहे.

आई म्हणजे प्रत्येकासाठीच सर्वस्व असते , जगातील कोणताही देव किंवा व्यक्ती ही आईची जागा कधीच घेऊ शकत नाही. सर्वात मोठे देवत्व हे आई मध्येच सामावलेले आहे. त्यामुळे आम्ही आईचे देऊळचं बांधण्याचा निर्धार केला व आईच्या आशीर्वादानेच आमचा हा संकल्प आता पूर्ण झाला आहे. असं यावेळी राजेंद्र खाडेंसह भावडांनी सांगितलं..

तर याविषयी दिवंगत राधाबाई खाडे यांच्या मोठ्या सून सुमित्रा खाडे म्हणाल्या, की 40 वर्ष माझा आणि सासूचा सहवास आला. मात्र या 40 वर्षात आम्हाला त्यांनी आईसारखे सांभाळले. आज त्या आमच्यात नाहीत, मात्र त्यांचं मंदिर बांधलंय. त्यामुळं खूप चांगलं वाटतंय. असं सून असणाऱ्या सुमित्रा खाडे यांनी भावना व्यक्त केल्या. तर यावेळी नात असणाऱ्या लोचना वणवे, चांगुणा दहिफळे,भक्ती खाडे यांनी देखील आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

तर यावेळी आपल्या मुलांनी पत्नीचं मंदिर बांधल्याने शंकर खाडे खुप चांगलं वाटत असून पत्नीची आठवण आली तर मी मंदिरात बसतो, असं सांगितलं. तर भाऊ कल्याण सानप यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान सावरगाव घाट हे गाव अगोदरच भगवान बाबांचे जन्मगाव असल्याने आणि याच गावामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगड स्थापन केल्याने, राज्यात ओळखलं जात आहे. तर आता मुखवटा पांघरून मॉडर्नपणा जगणाऱ्या जगात, आपल्या आईच देऊळ या सावरगावघाट मध्ये बांधणाऱ्या खाडे भावंडांमुळे पुन्हा एकदा या गावचं नाव, बीड जिल्ह्यातचं नाहीतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात , एका वेगळ्या आदर्श पणाने घेतला जात आहे. त्यामुळे या खाडे भावंडांचा आदर्श आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणाऱ्या, नतदृष्ट मुलांनी घ्यावा आणि आपल्या आई वडिलांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर हास्य उमलाव. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही…

महाप्रबोधन यात्रा ही फक्त कलेक्शनसाठी आहे ? शिंदे गट शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांचा गंभीर आरोप..

Previous article

राज्यात लवकरच ओबीसी ऐक्य यात्रा काढणार, राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्याक्ष कल्याण आखाडे यांची घोषणा..

Next article

Comments

Comments are closed.